Monday, April 18, 2011

रंगतदार नरेन्द्र डोंगर.

“आलास तर धावत्या भेटीवर येऊ नकोस.संध्याकाळच्यावेळी आपण डोंगरावरून वेंगुर्ल्याचा समुद्र आणि लाईट-हाऊस एकदा तरी पाहूया.तशात जर गोव्याकडून आलेली बोट दिसली तर खरंच मजा येईल.”
इंदू उठता उठता मला म्हणाली.

माझ्या मावसबहिणीने-इंदूने-फार पूर्वी सावंतवाडीला नरेन्द्र डोंगर्‍याच्या पायथ्याशी एक छोटसं घर बांधून घेतलं होतं.आता त्याला बरीच वर्षं होऊन गेली.
खरंतर वाडवडीलांच्या जुन्या घराचा कायापालट तिने करून घेतला होता असं म्हटलं तर जास्त उचित होईल.इंदू तिच्या लहानपणापासून ह्या घरात वाढली. लग्न झाल्यावर ती काही काळ घराला मुकली होती.आईवडीलांची एकच एक मुलगी असल्याने त्यांच्या पश्चात तिलाच हे घर मिळालं.जीवनाच्या संध्या-छायेत असताना ह्या घरात रहायचं तिने ठरवलं होतं.
मला भेटायला शहरातआली होती तेव्हा तिच्या नव्या घराच्या नव्या आणि जून्या आठवणी मला सांगत होती. त्याची आठवण आज मला झाली.

मला इंदू म्हणाली,
“आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेरून दिसतो तोच नरेन्द्र डोंगर.लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटातून तत्प रस उफाळून वर पृष्ठ भागावर येऊन नंतर कालांतराने तो रस थंड होऊन त्याजागी हे असेच अनेक डोंगर पृथ्वीवर निर्माण झाले आहेत. नरेन्द्र डोंगर हा त्यातलाच एक आहे.”
चिरायु झालेले हे डोंगर म्हणजे प्रेमाचं प्रतिक असतं. असं इंदू म्हणते.

“कोकणातल्या पावसच्या दिवसात डोंगराच्या माथ्याला जेव्हा काळेकुट्ट ढग चिकटलेले दिसतात . तेव्हा आणि डोंगराचे सर्व उभारलेले भाग जेव्हा ढगाच्या आत खूपसल्यासारखे दिसतात,तेव्हा ते धुरकटलेलं सर्व वातावरण पाहून मलाच मी हरवून जाते.”
इंदू मला सांगत होती.आणि पुढे म्हणाली,
“मान्सूनचा वारा सोसाट्याने वहात असल्याने,बारकाईने, ऐकण्याकडे लक्ष दिल्यास,डोंगरावरच्या सर्व झाडी मधून येणार्‍या वार्‍य़ाचं एक विलक्षण संगीत ऐकायला मिळाल्याचा आनंद होतो.
हे झालं पावसातलं वातावरण.कोकणात पडणार्‍या भरपूर पावसामुळे,नरेंद्र डोंगर कधीच बोडका दिसत नाही. ह्या डोंगरावर निरनीराळ्या वृक्षजाती आहेत.काही औषधी झाडा-पालाही मिळतो.डोंगर सदाचा हिरवागार असतो. काही लोक डोंगरावर शिकारीला जातात.बिबटा वाघ,गवा रेडा,रानडूकर असले प्राणी लोकांनी पाहिले आहेत.अर्थात निरनीराळ्या जातीचे साप,खारी,तसेच चित्र-विचीत्र रंगाचे पक्षीपण पाहायला मिळतात.
जसे ऋतू बदलतात तसे डोंगरावरचे रंगही बदलतात.पावसातल्या हिरव्या गार रंगानंतर,थंडीत काळसर भूरा होत होत बैंगनी दिसायला लागतो आणि भर उन्हाळ्यात पाण्याच्या आभावी काही ठिकाणी पिवळसर सुका रंग दिसतो.हे रंग विशेषकरून संध्याकाळच्यावेळी सूर्यास्त होत असताना निक्षून दिसतात.
त्याचं मुख्य कारण डोंगराच्या पलीकडून अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या रंगीबेरंगी किरणांची ही किमया असावी.

गावातल्या मोती तलावाच्या पश्चिमेला हा डोंगर आहे.मोती तलावाच्या सभोवती सावंतवाडी शहर वसलेलं आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्यावेळी डोंगर चढून वर गेल्यावर सूर्यास्ताच्यावेळी वेंगुर्ल्याचा समुद्र स्पष्ट दिसतो.काहीवेळा मुंबईहून आलेली बोट सकाळी उशीरा आल्याने,गोव्याला जाऊन परत मुंबईला जाण्यासाठी वेंगुर्ला बंदरावर मुंबईला जाणार्‍या प्रवाश्यांना घेऊन जायला ही बोट पुन्हा येते तेव्हा
बंदराच्या बाहेर नांगरलेल्या त्या बोटीला पाहून खूपच मजा येते.बोटीच्या धूरकांड्यातून वर येणारा धूर, वार्‍याच्या लयीवर वाकडा-तिकडा होत असताना दिसतो. काळोख होत असल्याने दोन्ही दिशेला दूरवर रोवलेले लाईट-हाऊसचे खांबे लुकलुकताना पाहून डोळे दिपतात.
संध्याकाळच्यावेळी सावंतवाडी शहराचं विलोभनीय दृश्य ह्या नरेन्द्र डोंगरावरून पहायला मिळतं.”

हे सर्व मला सांगत असताना इंदू थोडी भावनावश होत असल्याचं मला दिसलं.
मी म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“तो डोंगर माझा आहे.देवाने मला सांगीतलंय की,मी जरका त्याला साजेसा रंगवला तर तो मला मिळू शकतो.”
अर्थात,हे कुठच्याही डोंगराच्या संबंधाने केलेलं कवी-मनातलं विधान आहे.तुला तसं काहीसं नरेन्द्र डोंगराच्या बाबतीत वाटतं का?”

ऐकून इंदू म्हणाली,
“हीच कल्पना नरेद्र डोंगराच्याबद्दल मी माझ्या डोक्यात ठेवते.तो डोंगर माझा स्वतःचा होऊन सदाचाच माझ्या मनात रहावा असा माझा इरादा असतो.
जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा मी खिडकीतून नरेन्द्र डोंगराकडे पहात असते. माझ्या मनाला थोडा दिलासा मिळतो.माझ्या मुलांना काही समस्या निर्माण झाल्यास,नरेन्द्र डोंगराच्या पडलेल्या सावलीत मी लांबवर एकटक पहात असते.काहीतरी धीर देणारे विचार मला सुचतात. माझ्या ऐन्शी वर्ष वयाच्या आईला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मी नरेन्द्र डोंगराशी बोलले होते.माझ्या नवर्‍याला जेव्हा त्याच्या धंद्यात अडचणी यायला लागतात, तेव्हामाझ्या सान्तवनासाठी आमच्या घराच्या मागे येणार्‍या डोंगराच्या संध्याकाळच्या सावल्या माझ्या मनाला स्थिरता आणतात असं मला वाटत असतं.

माझ्या मनाचा एकच निश्चय झाला आहे की नरेन्द्र डोंगराचा विसर पाडून घ्यायला मला शक्यच होणार नाही नव्हेतर तसं व्ह्यायला मला अश्रू ढाळून डोळे सुजवून घ्यावे लागतील.

का कुणास ठाऊक,इतरांचं मला काही माहित नाही, पण मी मात्र, हा डोंगर त्याच्या संध्याकाळच्या रंगीबेरंगी छटामधे कसलीतरी जादू धरून असतो हे पक्क मानते.अगदी जसं जीवनात होतं तसं.
बरेच दिवसापूर्वी एकदा आम्ही सूर्यास्ताच्यावेळी डोंगर चढून वर गेलो होतो.डोंगरावर जागोजागी वारली लोक झोपड्या बांधून गेली कित्येक वर्ष राहत आहेत.तेव्हा आम्ही पाहिलं की,काही स्थाईक लोक सूर्यास्तावेळी आपली कामं क्षणभर थांबवून,सूर्याची लुप्त होणारी किरणं डोंगराला प्रज्वलीत करतात,त्यावेळी हळू हळू येणार्‍या सावलीतून सर्व डोंगर काळोखाच्या छायेत जात असताना मनात प्रार्थना करीत असतात.तो क्षण ते निरखून न्याहळत असतात.मला कुणी सांगीतलं की हिमालयात पण असाच एक रिवाज आहे.आम्ही पण संध्याकाळी आमच्या घरात सूर्यास्तावेळी हा क्षण साजरा करतो.
काही क्षणच,दूरवरच्या डोंगरावरच्या लोकांशी जोडले जाऊन त्या अविनाशी रंगीबेरंगी सूर्यकिरणांच्या देखाव्याशी आम्ही जोडले जात असतो.ह्या क्षणभर टिकणार्‍या वरदानचं आम्ही आदर करतो. आम्ही डोंगरावर गेलोच नसतो तर हा रिवाज आमच्या लक्षात आलाच नसता.

आता संध्याकाळी स्वयंपाक करीत असताना,सूर्यास्त होत असताना,स्वयंपाक घरातल्या खिडकीतून त्या क्षणाशी एकरूप व्हायला मला बरेच वेळा संधी सापडते.लहानपणी ह्याच घरात मी वाढले असल्याने,माझ्या आईबरोबर तिला मदत करायला संध्याकाळच्यावेळी स्वंपाकघरात वावरण्याचा मला बरेचवेळा योग आला होता.उजाडलेल्या दिवसाच्या लयबद्धतेत दिवसाच्या अंत होण्याच्या लयीमधे माझं लहानपणापासून निर्माण झालेलं हे खास गठबंधन असावं.
सूर्यास्ताबरोबरचे माझे जिव्हाळ्याचे संबंध माझ्या जीवनाशी अजूनपर्यंत निगडित राहिलेले आहेत.

नरेन्द्र डोंगरातून मिळणारी शक्ती आणि सुंदरता मी रोज माझ्या संग्रहात ठेवण्याच्या प्रयत्नात असते.उद्याचं कुणी सांगावं.सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या त्या रंगीत क्षणांच्या छटा माझ्या जीवनावर सकाळपासून रात्र होईतोपर्यंत पडतात,त्या समजून घेण्याच्या आणि त्यांची प्रशंसा करण्याच्या मी प्रयत्नात असते.

ह्या डोंगरात असलेल्या क्षमतेमधून मी शक्ती आणि परिश्रम ह्याबद्दल शिकेन ह्यावर माझा भरवसा आहे.तसंच, माझ्या उरलेल्या जीवनात जरूरीचं यथादर्शन तो मला देईल अशी मी आशा करीत असते.सदासर्वकाळ सूर्यास्त आणि नरेन्द्र डोंगर ह्यांच्या मी प्रेमात पडलेली रहावी अशी मी इच्छा करीत असते.”

मी इंदूला म्हणालो,
“माझी मावशी असताना मी बरेच वेळा तुझ्या ह्या सावंतवाडीच्या घरात राहून गेलोय. आमच्या लहानपणी संध्याकाळच्यावेळी मावशी मिणमिणत्या दिव्यात नरेन्द्र डोंगरावरच्या श्वापदांच्या,गोष्टी रंगवून,रंगवून सांगायची.
त्यामुळे नरेन्द्र डोंगराबद्दल मला तरी निराळीच भीती वाटायची.
तुझ्याकडून आता हे ऐकून मलाही ह्या डोंगराबद्दल प्रेम वाटायला लागलंय.वेळात वेळ काढून मी नक्कीच सावंतवाडीला येईन.तुझ्या दृष्टीकोनातून
डोंगराकडे पहायला मला निश्चितच आनंद होईल.”

“आलास तर धावत्या भेटीवर येऊ नकोस.संध्याकाळच्यावेळी आपण डोंगरावरून वेंगुर्ल्याचा समुद्र आणि लाईट-हाऊस एकदा तरी पाहूया.तशात जर गोव्याकडून आलेली बोट दिसली तर खरंच मजा येईल.”
इंदू उठता उठता मला म्हणाली.
मी त्यानंतर वेळातवेळ काढून सावंतवाडीला गेलो होतो. इंदूबरोबर नरेन्द्र डोंगर चढून गेलो होतो.आणि वेंगुर्ल्याचं बंदर तसंच गोव्यावरून येणारी बोट पाहिली होती.खुश झालेला इंदूचा चेहरा अजून मला आठवतो.

आता इंदू राहिली नाही.त्यानंतर मी पण बरीच वर्षं सावंतवाडीला गेलोच नाही.नरेन्द्र डोंगराचा आता कायापालट कसा झाला असेल कुणास ठाऊक.बदल होत असतात.आणि बदल झालेच पाहिजेत.नरेन्द्र डोंगरावर चढून ती गोव्याहून आलेली बोट इंदूबरोबर जाऊन पहायला एकदाच माझ्या भाग्यात होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com