Tuesday, April 12, 2011

नाचातला आनंद.

“मी लग्नकार्यात नेहमीच नृत्य करतो.तुम्ही नृत्य करता का? मला वाटतं तुम्हीही करावं.मला तरी असं वाटतं.”

परवा माझ्या एका नातेवाईकाच्या नातीच्या लग्नाला मी गेलो होतो.लग्नकार्य मस्त झालं होतं. बाकी सर्व कार्यक्रम नेहमीचे झाले तरी जेवणं झाल्यावर नाचाचा कार्यक्रम होता.सर्वांनी मिळून येऊन नाचायचं होतं.
पंजाबी लोकांच्या लग्नकार्यात नाचाचा अविभाज्य भाग असतो.हे मला ठाऊक होतं.पण आता आपल्या मराठी लोकांच्या लग्नात नाच असणं हे मला जरा नवीनच होतं.

मला फारच आग्रह झाल्याने मी पण थोडा नाचलो.पण मला दमायला झालं.स्टेजवरून खाली येऊन एका सोफ्यावर आराम करीत होतो.स्टेजवर फार जोरजोरात आनंदात येऊन नाचणारे एक गृहस्थ माझ्या जवळ येऊन बसले.बरेच थकलेले दिसत होते.

मला म्हणाले,
“मी लग्नकार्यात नेहमीच नृत्य करतो.तुम्ही नृत्य करता का?
मला वाटतं तुम्हीही करावं.मला तरी असं वाटतं.”
मी म्हणालो,
“अहो,मी प्रथमच आज नाचलो.जरा दमायला झालं म्हणून आराम करायला खाली येऊन बसलो.”
मग आमच्या गप्पा चालू झाल्या.

ते गृहस्थ मला म्हणाले,
“जीवनसंबंधाने आणि प्रेमसंबंधाने, लग्नकार्य हा एक, आनंद करण्याचा आणि समारोहात भाग घेण्याचा उत्तम प्रसंग आहे.
हा समारोह होत असताना,वरातीचा सोहळा चालूच असतो,सोहळ्याच्या मागोमाग स्वागत-समारोह होत असतो,भोजन-समारोहा मागोमाग नृत्याचा कार्यक्रम चालू होतो.
नृत्य चालू झालं म्हणजेच,खरा समारोह चालू होत असता असता समाप्तीला येतो, ती वेळ आली असं समजायला हरकत नाही.तसं पाहिलत तर हा लग्न-सोहळा म्हणजे सबकुछ नृत्याचा सोहळा असं मला नेहमीच वाटत असतं.मी नेहमीच लग्नाच्या सोहळ्यात नाच करतो.”

“मी तुम्हाला नाचाताना पाहिलं.तुमची एनर्जी पाहून मला तुमचं कौतूक वाटलं.”
मी त्यांना म्हणालो.
माझं त्यांच्या विषयीचं मी सांगीतलेलं मत ऐकून गृहस्थ खूष झालेले दिसले.समोर आलेल्या वेटरच्या ट्रेमधून एक ग्लास सरबत मला देत एक आपण घेत मला म्हणाले,
“मी तुम्हाला ह्या नाचाविषयी माझा अनुभव सांगतो”
सरबत घटकन पिऊन झाल्यावर मला म्हणाले,
“गेल्या महिन्यात मला अशाच एका लग्न-सोहळ्या्चं आमंत्रण आलं होतं.मला नाचायची संधी मिळाली होती.आणि मी प्रचंड खूश झालो होतो.रुढीनुसार लग्न सोहळा संपता संपता छायाचित्र टिपण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर लगेचच,जेवणाचा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम संपायला येता येता गान-वादनाचा ऑर्केस्ट्रा वाजायला सुरवात झाली.काही लोक नाचायच्या तयारीने स्टेजवर यायला लागले.काही स्टेजवर येऊन इकडे तिकडे घुटमळायला लागले.काही पेयांच्या काउंटरकडे जाऊन ग्लासं भरून भरून प्यायच्या तयारीला लागले.थोडा अवधी निघून जाईतोपर्यंत स्टेज गच्च भरून गेलं होतं.सर्व खुशामतीत आलेले दिसत होते.नाच-गाणं चालू झालं होतं.

बराचवेळ नाचल्यानंतर मला खूपच दमायला झालं.स्टेजवरून खाली उतरल्यावर आजुबाजूला पाहिल्यावर बरेच लोक बघ्या सारखे बसून होते असं माझ्या लक्षात आलं. आपआपसात कुजबूज करून स्टेजवर चाललेल्या नृत्याच्या कार्यक्रमावर कुत्सीत टिका करीत होते नाकं मुरडीत होते. फाल्तुगीरी आहे असं पुटपूटत होते.काही एकाकी झालेले दिसत होते,कंटाळलेले दिसत होते.

अश्या लोकात गप्पा करायला मला जरा कठीण व्ह्यायला लागलं.मला तर नाचून नाचून मजा आली होती.मी अगदी थकून गेलो होते.आणि का न तसं व्हावं? तसं पाहिलंत तर सर्वचजण समारोहाचा आनंद घ्यायला आले होते.वधु-वरांना आशिर्वाद द्यायला आले होते.वधु-वराच्या प्रेमाच्या आणि वचनबद्धतेच्या शुभ-समयाला त्यांच्या आनंदात भागीदार व्हायला आले होते.

ह्या बघ्यांकडे बघून माझ्या मनात आलं की,ते नेहमीच निरुत्साही असावेत.फार असुरक्षित असावेत.किंवा कदाचीत त्यांना नाच करायला कुणीही सोबती मिळत नसावा.तसं पाहिलंत तर जीवनात असे बरेच प्रसंग येतात की आपल्याला वाटत असतं की,जीवनात उत्साह वाटण्यासारखं काहीच नसतं,काहीना काही गोष्टी करायला असुरक्षित वाटत असतं,एकटं एकटं राहिल्याविना गत्यंतर नाही,वगैरे वगैरे.

पण ही कारणं समारंभासारख्या ठिकाणी न नाचण्यासाठी होऊ नयेत असं मला वाटतं.नृत्य करणं म्हणजे जीवनातल्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणं.
तसंच नृत्य म्हणजे बर्‍याच गोष्टींचं प्रकटन करणं.जश्या-चांगुलपणा, वाईटपणा, वेदना, परमानंद, रोजच्या आनंदी घटना वगैरे.

पण जे त्या नृत्यात भाग घ्यायला कबूल नव्हते,ज्याना कंटाळा आला होता,ज्याना त्या सोहळ्याचा आनंद लुटावासा वाटत नव्हतं,त्या सर्वांनी जीवनातल्या ह्या अगदी साध्या गंमतीच्या प्रकटनापासून स्वतःला दूरावून घेतलं होतं असं मला त्यावेळी वाटलं.सरतेशेवटी मी म्हणेन की,नृत्य करायला कोणच एव्हडा उदास असू शकत नाही.”

त्यांचं हे ऐकून मला काहीतरी बोलावं असं वाटलं.
मी म्हणालो,
“मला असं वाटतं,आपल्या जीवनात आपण सर्व कधी कधी कद्रु-वृत्तिचे होत असतो.त्यामुळे जीवनातल्या उन्मुक्त नृत्याचा आणि मजेचा आनंद आपल्याला दिसत नाही.एव्हडंच नव्हे तर काही लोक आमच्यासारख्याकडूनसुद्धा त्यातला आनंद उपभोगायच्या मनस्थितीत नसतात.”

“मला हेच म्हणायचं होतं.”
असं म्हणून मला ते सांगू लागले,
“तसं असलं तरी मी मात्र माझ्या तत्वांना चिकटून असतो.भले दुसर्‍या कुणालाही माझ्या नाचण्यात किंवा माझ्या आनंदात विघ्न-संतोषी व्हायचं असलं तरी चालेल.कुणी न्याहाळत नसलं तरी मला नाचायला आवडतं.मग तो नाच लग्नकार्यातला असो,जीवनातला नाच असो, आनंद करतानाचा नाच असो, किंवा मजा करतानाचा नाच असो.मला नाचायला आवडतं.”

परत वेटरकडून एक ग्लास सरबत घेऊन, घटकन पिऊन झाल्यावर स्टेजवर चालू असलेल्या नाचात ते गृहस्थ सामील व्हायला उठले.
मी मनात म्हणालो,
“ऐसाभी कोई होता है”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com