Thursday, October 6, 2011

जीवनभरची शिकवणूक म्हणजेच आनंदमय जीवन.



“असं दिसतं की,मोठ्यांचा दुप्पटीपणा आणि दांभिकपणा लहान मुलांना अगदी स्पटिकाप्रमाणे स्पष्ट दिसतो.”

रंजना माझ्याकडे दळव्यांची नाटकाची पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन जायला आली होती.आमच्या थोडया गप्पा झाल्या.
मी रंजनाला म्हणालो,
“जीवन जगताना जगात शिकण्याचे खूप मार्ग आहेत.पुस्तकं वाचून खूपच ज्ञान मिळतं.तसंच अनुभवातूनसुद्धा भरपूर ज्ञान मिळतं.असं माझ्या ध्यानात आलं आहे.तुझं काय म्हणणं?”

मला रंजना म्हणाली,
“माझ्या मनात असेच विचार येतात.अनुभवातून मिळणारी शिकवणूक जर का आपण योग्य तर्‍हेने वापरली तर जीवन नक्कीच आनंदमय जातं.
प्रत्येक जीवंत प्राण्याकडून मला शिकवणूक मिळते.मात्र ते जे काय शिकवत असतात ते पहायला माझे डोळे उघडे हवेत आणि ऐकायला कानही उघडे हवेत.हृदयही उघडं हवं,कारण ही शिकवणूक ध्यानीमनी नसलेल्या उगम स्थानातून येऊ शकते.
हे मला हळू हळू समजायला लागलं.इतराना जसं कळतं तसच मला जीवनातल्या घटनानी ह्या शिकवणूकीच्या शक्यतेसाठी जागं केलं.”

“तुझ्या आईची तू खूप सेवा केली आहेस.मला त्याची आठवण येऊन तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.”
मी रंजनाला म्हणालो.

“मला माझ्या आईने विनाशर्त प्रेम कसं करावं हे शिकवलं.”
रंजना मला सांगायला लागली.
“माझी आई अंथरूणाला खिळली होती.माझ्या आईची सेवा करण्यासाठी,तिची काळजी घेण्यासाठी,ह्या ऐहिक जीवनातल्या सर्व आसक्तीना मला तिलांजली द्यावी लागली होती.तिचा हात माझ्या हातात घेऊन,त्या लोकांच्या जगात, ज्यांना सध्याच्या जगाचा बोध घेऊन,पुढच्या जगात जाण्याच्या तयारीला लागावं लागलं होतं,त्या जगात निर्भिडपणे तिच्या बरोबर मला चालत रहावं लागलं होतं.

तिच्या दुःखांची,वेदनांची मी साक्षी आहे.आणि होय तिच्या सुखांची पण मी साक्षी आहे.माझ्या आईवर तिच्या अंतिम काळात मी विनाशर्थ प्रेम करण्याचं शिकत असताना मला,धांवायचं मनात असताना खंबीर उभं रहावं लागलं.रडावं असं मनात आलं असताना,चेहरा हसरा ठेवावा लागला.
लोटांगण घालावं असं मनात असताना तिला मिठीत घ्यावं लागलं.

मी एक शिकले की पुरेपूर प्रेमामुळेच मी काहीही करायला समर्थ झाले.सवय झाल्याने,धावायचं,रडायचं किंवा लोटांगण घालायचं माझ्या मनात यायचं बंद झालं.तिच्या आजारात एक साक्षी म्हणून रहाण्याची मी संधी पहात होते.ही साक्षच मला,एकात्मकता,आपलेपण म्हणजे काय ते शिकवू शकली. विनाशर्थ प्रेमातली सुंदरता मला कळली होती.

मला माझ्या आईकडून शिकवणूक मिळाल्या नंतर,आईपणाच्या अनुभवातून शिकवणूक मिळाली.माझा मुलगा माझा मोठा शिक्षक होता.
त्याच्याकडून सर्व स्पष्ट कळायला लागलं.त्याच्याकडून मी शिकले की,जर का मी त्याला म्हणाले इतरांशी मी सहमत आहे तर मला सहमत रहावं लागायचं.आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे आणि उत्साही राहून.मी जर म्हणाले अमूक एक गोष्ट बरी नाही तर ती मी करता कामा नये हेही मला लक्षात ठेवावं लागायचं.मी म्हणाले की,मी विनाशर्थ प्रेम करणारी आहे तर कुणाचीही आलोचना करायची झाल्यास मला ती प्रेमाने करावी लागायची. सजा देण्याऐवजी माफ करावं लागायचं.असं दिसतं की,मोठ्यांचा दुप्पटीपणा आणि दांभिकपणा लहान मुलांना अगदी स्पटिकाप्रमाणे स्पष्ट दिसतो.

मुक्या प्राण्यांकडून मी ईमानदारी,निष्ठा आणि अज्ञानता काय असते ते शिकले.बाहेरून आल्यावर मी घराच्या प्रवेश दारात दिसल्यावर मोठ मोठयाने भूंकणार्‍या,माझ्या जवळ येऊन प्रेमाने चाटायला पहाणार्‍या आमच्या मोत्याला साखळीला बांधून ठेवण्यात काही जणाना काय मिळतं कुणास ठाऊक.
पांढर्‍या शुभ्र मोत्याच्या इवलुश्या जीभेने दिलेल्या मुक्याच्या स्पर्शाने,मला जाणवणारी त्यातली निर्दोषता आणि गोडवा,मला व्याकुळ व्हायला भाग पाडतो.मी त्याला जवळ ओढून त्याला स्पर्श केल्याने,त्याच्याशी लाडीक बोलल्याने,त्याला इतकं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की ह्या कृतीला जवाब नाही.

मला असं वाटायला लागलं आहे की,माझ्या मनात जे काही निर्माण होतं ते मी कार्यान्वित करू शकते. त्याच बरोबर मी हेही शिकले आहे की,ज्यावर माझा विश्वास आहे त्याचं मी परीक्षण करू शकते. तसंच,माझे विचार इतर जे वाटून घेत नाही नाहीत त्यांच्या त्या वृत्तीचा मी स्विकार करू शकते.

मला माहित झालं आहे कधी कधी संदिग्धतेतसुद्धा मला माझं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे.
माझ्यापेक्षा ज्याना जास्त ज्ञान आहे ते ज्ञान त्यांच्याकडून मला मिळत असताना मला ते बक्षीस म्हणूनच मिळत आहे असं समजलं पाहिजे.मी हेही शिकले आहे की,कुणाकडेही असलेली प्रतिभा ही एक सकारात्मक शक्ती असते आणि इच्छुक प्राप्तकरत्याला ती शक्ती समर्पण करायची झाल्यास ती सहजच करता येते.”

“ह्यावर मी तुला काय म्हणू?”
असं म्हणून मी रंजनाकडे तिचा प्रतिसाद काय येतो तो पहात होतो.ती बोलण्यापूर्वीच मी तिला म्हणालो,
“तुला जीवनातल्या अनुभवातून मिळालेली ही शिकवणूक मला काहीतरी ज्ञान देऊन गेली.”
हसत हसत रंजना पुस्तकं पिशवीत भरून जायला निघाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com