Sunday, October 9, 2011

मी नेहमीच वर्तमानकाळात जगतो.



“जीवनाच्या अखेरीला मला मागे वळून पाहून माहित करून घ्यायचं आहे की मी माझा वर्तमानकाळ जगत असताना वेळेचा अपव्यय मुळीच केला नाही.”

अरूणचं लग्न होऊन दोन वर्षं झाली.अलीकडे त्याचा बिझीनेसपण उत्तम चालला होता.औषधं विकण्याचा त्याचा व्यवसाय होता.शहरात जागोजागी जाऊन फार्मसीमधे तो औषधं घेऊन जायचा.त्याची डीलिव्हरी करायचा.

गेल्या वर्षापासून त्याला मोटरसायकल घ्यायची जरूरी भासत होती.पण हा प्रश्न तो त्याच्या आईकडे आणि बायकोकडे काढत नव्हता.ट्रॅफिकमधे हे वाहन फार धोकादायक आहे हे त्या दोघांनी त्याला ठसकावून सांगीतलं होतं.शेवटी कसंतरी त्या दोघांना समजावून सांगून त्याने नवीन मोटरसायकल घेतली होती.घेऊन सहामहिने झाले असतील.एकदा एका रिक्षेला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची स्पीड कमी पडली आणि समोरून येणार्‍या टेम्पोशी त्याची टक्कर झाली.

मला हे कळल्यावर मी आणि त्याचा मोठा मामा त्याला हॉस्पिटलात बघायला गेलो होतो.अरूणचं नशिब बलवत्तर असल्याने तो बालबाल वाचला.

दोन महिन्यानंतर अरूणला घरी आणलं होतं.कुबड्या लावून तो चालत होता.मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याचा मामाही अगोदरच आला होता.

“मी माझ्या आयुष्यात असली धोक्याची वहानं कधीच वापरली नाहीत.तशात मोटरसायकलला मुळीच संरक्षण नाही.आणि त्याउप्पर ती तोल संभाळून चालवावी लागते हे आणखी एक रीस्क.
अरूणने सांगूनसवरून असं करायला नको होतं.”
असं मी अरूणच्या मामाला म्हणालो.

हे ऐकून अरूणचा मामा जोरदार हसला.बहुतेक त्याला माझं म्हणणं हास्यास्पद वाटलं असावं.म्हणूनच तो मला म्हणाला,
“माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो.मी माझ्या मनात समजत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त मरणकाळाचा अनुभव घेतला आहे.माझ्या मनात आलेल्या अनुभवायच्या विचारापलीकडे मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. मी वेदना जेव्हड्या म्हणून सोसल्या आहेत त्यांचं परिमाण काढता येणार नाही.अगदी जगण्यासाठी लढाई देताना शरीराची कल्पनेपलीकडे हानी होत असतानासुद्धा.

अगदी जवळचे स्वतःची जगण्यासाठी लढाई देत असताना, त्याना माझ्याकडून होईल ती मदत मी करीत असताना त्यांच्या जवळ राहूनसुद्धा ते हिरावून घेतले जाणार आहेत ह्याचा मनस्तापही सोसला आहे.अजीब तर्‍हा सांगायची झाल्यास मी मरणाची खंत न करायचं शिकलो,आणि जगण्याचीच जमेल तेव्हडी प्रशंसा करीत राहिलो.

मला आठवतं मी वीसएक वर्षांचा असेन.माझीच मोटरसायकल मी चालवताना मला अपघात झाला. हॉस्पिटलात गेल्या गेल्याच मेल्याचं जाहीर व्हावं अशा परिस्थितीत मी होतो.अतीदक्षाता कक्षात मी बारा दिवस होतो.माझं शरीर खिळखीळं झालं होतं.दोनदा मी जवळ जवळ मरायच्यास्थितीत होतो.मला न्यायला मृत्यूला सोपं झालं होतं.पण दोन्ही वेळेला ते माझ्यावर अवलंबून होतं.दोन्ही वेळेला मी मृत्यूला झुंझ दिली.मृत्यूला मी घाबरत होतो म्हणून नव्हे तर जीवनावर मी प्रेम करीत होतो म्हणून.

नंतर,माझी आई जेव्हा मरणाच्या पंथाला लागली होती,तेव्हा मी तिची काळजी घेत होतो.जेव्हा तिची जायची वेळ आली तेव्हा ती प्रक्रिया माझ्या परिचयाची होती.मी स्वतः ते भोगलं होतं.मला आठवतं अगदी शेवटी मी तिच्या डोक्यावरच्या केसावरून हात फिरवीत होतो.तिला खूप आराम वाटत होता. नंतर,थोड्याचवेळात ती गेली.

दुसरा प्रसंग आठवतो तो माझ्या एका मुलाच्या बाबतीत.ती दोन वर्षं तो एका दुर्धर रोगाने पछाडला होता. त्याच्या शेवटच्या दिवसात मीच त्याची देखभाल करीत होतो.आम्ही दोघे एकमेकाचे साथीदार होतो.बरेच वेळा आम्ही जीवन-मृत्यूबद्दल आणि त्यापलीकडचं ह्याबद्दल बोलायचो.आणि त्याची जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा मी त्याच्या नजरेत नजर घालून होतो.तो तीस वर्षाचा होता.तो गेल्यावर मी संपूर्ण कोसळलो.

मृत्यूला ज्यावेळी मी सामोरा गेलो त्यावेळी मी बरच काही शिकलो.जीवन हे सहजची स्वीकृती आहे असं समजू नये.
जीवन क्षणिक असतं,संवेदनशील असतं आणि क्षीण असतं.
दोन आठवडे अतीदक्षता कक्षेत राहून झाल्यावर मला ज्यावेळी स्वच्छ आणि शुद्ध हवेचा श्वास घेता आला ते मी कधीच विसरणार नाही.
व्हिल-चेअरवरून मला जेव्हा एका नर्सने बाहेर स्वच्छ हवेत आणलं,तेव्हाचा आनंद माझ्या मनात कायमचा आहे.त्यानंतर मी नेहमीच मनात ठरवलं की,शुद्ध हवेची चव मी कधीच विसरता कमा नये.

मला कष्ट घ्यायला आवडतं.भविष्याबद्दल मी सावध असतो.भूतकाळ मी नेहमीच विचारात घेतो. परंतु,वर्तमानकाळ मी जगतो.शुद्ध हवेत मी रस घेतो,सकाळीच माझ्या प्रेमळ लोकांबरोबर मी कॉफीचा आस्वाद घेतो,मागच्या परसात उडत रहाणार्‍या फुलपाखरांची मी मजा लुटतो,लहान मुलांच्या समुहात मी वेळ घालवतो, माझ्या धाकट्या भावाच्या विनोदावर मी हसून आनंद घेतो.

माझं मोठ्यात मोठं आव्हान म्हणजे योग्य दृष्टीकोन ठेवणं.स्वतः मौज लुटल्याशिवाय माझं जीवन मी असंतसं जाऊ देत नाही.जीवनातल्या महत्वाच्या घटना आणि साधे सरळ क्षण ह्यांचा तालमेल असायला हवा असं मला नेहमीच वाटतं. माझ्या जीवनाच्या अखेरीला मला मागे वळून पाहून माहित करून घ्यायचं आहे की मी माझा वर्तमानकाळ जगत असताना वेळेचा अपव्यय मुळीच केला नाही.”

अरूणच्या मामाने आपली कथा सांगीतल्यावर मी माझ्या मनात म्हणालो,
“जसा मामा तसा भाचा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com