Tuesday, October 18, 2011

अनंतराव (अंत्या) अंतरकर.

“पण अंत्याच्या बाबतीत,साईटवर “लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक” असं काहीसं आहे.”

आज मला अनंतराव अंतरकरांची बर्‍याच वर्षानी आठवण आली.अनंतरावाना अंत्या म्हणून जास्त ओळखलं जातं.
अनंतराव मुळ कोकणातले.माडा-पोफळीच्या बागा,कलमी आंब्यांची बनं,भात-शेतीचे कुणगे ही त्यांच्या वाडवडीलांची मिळकत,त्यातून खच्चून येणारं उत्पन्न उदर्निर्वाहासाठी खर्चूनही भरपूर बचत होतेच.तशांत अंत्या लग्नाच्या भानगडीत अजीबात पडले नाहीत.त्यामुळे संसाराचा खर्च निश्चितच वाचला.थोडे स्वतःच्या कनवटीचे पैसे घालून एक साईट त्यांनी तयार केली.
एका सदगृहस्थाच्या सुचनेवरून मी ह्या साईटवर माझे पोस्ट लिहायला लागलो.
माझे त्या साईटवर तीनशे लेख लिहून झाल्यावर अंत्याची आठवण येऊन तीनशेवा लेख लिहाला.त्याची आठवण आली.लेखाचं शिर्षक होतं,

“अंत्या म्हणजे शब्द-चुंबक.”
मंडळी,आज आम्हाला ह्या साईटवर येऊन बराच काळ निघून गेला.ह्या अवधीत आमचा हा 300 वा लेख आहे. आम्हाला वाटलं आज आपण ह्या तिनशेव्या लेखामधून अंत्याचे आभार मानावे.त्याच्याच कृपेने आम्हाला एव्हडं लेखन करता आलं.साईटवर लेखन स्वातंत्र्य,शुद्ध/अशुद्ध लेखन स्वातंत्र्य,लेखनातल्या विचाराचं स्वातंत्र्य, प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, प्रती-प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, एव्हडं स्वातंत्र्य आम्हाला स्वतःच्या ब्लॉग शिवाय कुठेच मिळालं नसतं.नव्हेतर ही साईट हा आमचा स्वतःचाच ब्लॉग असं समजून आता पर्यंत आम्ही लिहीत आलो.

अंत्या हा विषय घेऊन हा लेख लिहावा असं आमच्या मनात आलं आणि सुचत गेलं ते लिहिलं.त्यात काही आम्ही पाप केलं असं आम्हाला मुळीच वाटत नाही.अंत्याला पण आम्हाला वाटतं तसंच वाटो ही अपेक्षा.
अंत्या ह्या व्यक्तीचा आम्ही विचार केला.आणि आम्हाला जे सुचलं ते आम्ही खाली लिहीत आहो.
ह्या साईटवर अंत्या ह्या शब्दात चुंबकत्व आहे.असं मला दिसून आलंय.
“लाईक पोल्स रिपेल ऍन्ड अनलाईक पोल्स ऍट्रॅक”
अशी लोहचुबंकाची थेअरी आहे.
पण अंत्याच्या बाबतीत,
साईटवर “लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक” असं काहीसं आहे.
म्हणून म्हणतो अंत्या म्हणजेच शब्द्चुंबक म्हटलं पाहिजे.
आता मी काय साईटवर अवलोकन केलं आहे ते सांगतो.
साईटवर अंत्याचा लेख आणि त्याचं नाव दिसलं की वाचकांची हीss झुंबड लागते.वाचायला आणि लिहायला.
कशासाठी बरं?
अशासाठी, की अंत्या ह्या शब्दात एक प्रकारचं चुंबकत्व साईटवर निर्माण झालं आहे.
अंत्याचा लेख असल्यास वाचण्यासाठी.
अंत्याच्या लेखावर एखादा प्रतिसाद असला तर आणखी प्रतिसाद देण्यासाठी.
नसला तर पहिलाच प्रतिसाद देण्यासाठी.
अंत्याने वेळ काढून कुणाच्यातरी लेखनावर आपला प्रतिसाद दिला तर लेखकाला खूप धन्य वाटतं.(सहाजीक आहे)
ताबडतोब अंत्याला तिथेच आभाराचे प्रती-प्रतीसाद दिले जातात.
साईटवर अंत्याने जर काही नियम आणले की,
“अंत्या तुमच्याशी मी अगदी सहमत आहे”
हे लिहायला पण चूरस लागते.
अंत्यावर दिलेली प्रतीक्रिया वाचून काहींची +१ ची प्रोग्रार्म्ड चीप तयार असते.आणि पटकन डाऊन-लोड केली जाते.
अंत्याला हाणायला-अर्थात प्रेमाने-काही ठरावीक लोक अंत्याशी आपला अगदी गाढा संबंध आहे-कदाचीत असेल ही- अशा अविर्भावात संधी सोडत नाहीत.
तसंच अंत्याने यदाकदाचीत कुणाची “**मत” केली तर अळीमिळीगुपचीळी करून बसणारे आहेत.
अंत्याबद्दल मी किती किती लिहू? आणि काय काय लिहू? मला दिसलं ते मी लिहीलं.

मी मात्र शपथ घेऊन सांगतो अंत्याशी मी असा कधीही वागलो नाही.निदान असं मनात ठेवून वागलो नाही.मग तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊं.पण एक मात्र सांगू इच्छितो की,
“हम गर्वसे कहते हैं के हम अंत्याकेसाथ चापलूसी कभी नही किई.!”
म्हणजे इतर अंत्याचे चापलूस आहेत् असं मी म्हणतो असं मुळीच गैरसमज करून घेऊ नका बरं का!
जिथे अंत्याची स्तुती करायला हवी तिथे मी “अजाबात” काटकसर केली नाही.अंत्याचे नृत्यावरचे लेख वाचून मी पूरा थक्क झालो.(आम्हाला नृत्यातला काही गंध नाही हा विषय वेगळा)पण म्हणून काय झालं?नृत्याचा विषय क्लिष्ट न करता सर्व नृत्य-प्रकाराची माहिती करून देणं हे काही सोपं नाही.आणि ते सुद्धा पॉप्युलर नृत्यांची उदाहरण्ं देऊन असं करणं काही खायचं काम नाही.परंतु,कधी कधी मला अंत्याची काही टिका पटली नाही तर मी अंत्याला सरळ सरळ सांगायला कचरलो नाही.आणि कदाचीत माझ्या सारखे काही लोक कचरलेही नसतील.तसंच कधी कधी आडून मी अंत्याला बाण मारले आहेत.हे कबूल करतो.आणि माझं आडून बाण मारणं पाहून काहीनी अंत्याला चिथवायला- गमंतीत- कमी केलेलं नाही.
.”अंत्या ये आपके उपर सीधा हल्लाबोल है”
असंही सांगून पाहिलंय.पण अंत्याने ते कधीही सिरयस्ली घेतलं नाही.कारण अंत्याच्या मला दोन पर्सन्यालिटी दिसतात.

एक पर्सन्यालीटी अशी की अंत्याने सिरयस्ली-म्हणजे समजलं ना?- लिहायला सुरवात केली,(अंत्याने बोलायला सुरवात केली तर कसं बोलतो त्याचा मला अनुभव नाही)की, मराठी बाराखडीतल्या ठरावीक बाराखड्या,उदा.भ..ची बाराखडी, ग..ची, म..ची, च..ची, र..ची आणि अशाच काही बाराखड्या अनमान न करता वापरायला कमी केलेलं नाही.कोकणीत ज्याला उघडपणे “गाळी” म्हणतात त्याचा वापर अचूक आणि यथार्थ करण्यात आपलं स्कील दाखवलं आहे.यात वाद नाही.कारण अंत्या त्यात वाकीब आहे असा माझा (कदाचीत गैर) समज आहे.मी काही वेळां अंत्याच्या काही लेखनात तसं वाचलं आहे म्हणून सांगतो.
पण अंत्याची दुसरी पर्सन्यालीटी की जेव्हा अंत्यावर “इल्लीशी” टिका होऊन सुद्धा मोठ्या मनाने अंत्या,
“नाही रे,त्यांचं माझ्यावर प्रेम आहे” किंवा,
“बरं बुवा!” (म्हणजे जाऊं दे ना आता)
अशी प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. प्रेमाने का होईना टिकेतली हवाच काढून घेण्याची अंत्याची दुसरी पर्सन्यालीटी वाखाण्यासारखी आहे.अगदी कोकणातल्या फणासा सारखं.आतून रसाळ गोड. अंत्या, माझ्या कोकणातला आहे हा मला एक अंत्याबद्दल “ऍडेड पॉइंट” वाटत असतो.

हे मी सर्व तुम्हाला सांगत आहे ते एव्हड्यासाठीच की अंत्या हा शब्द्च ह्या साईटवर चुंबकासारखा (लोहचुंबक लोह खेचून घेतो तसा)आहे.आणि अंत्याचं शब्द्चुंबकाचं क्षेत्र(जसं लोहचुंबकक्षेत्र असतं तसं) सर्व साईटभर पसरलं आहे.आणि का पसरूं नये हो?
पदरची कनवट रिकामी करून (इती वर्तमान पत्राचा रिपोर्टर) साईट चालवणं म्हणजे काय खायचं काम आहे काय? आणि ते सुद्धा ऐन उमेदीत.(हे पण वर्तमान पत्रावरून).
अंत्याला मी माझ्या मुलासारखा समजतो.माझा मुलगाच अंत्यापेक्षा दहा वर्षानी मोठा आहे. कोकणात आईला प्रेमाने “म्हातारी” आणि वडलांना किंवा वयस्कराना “म्हातारा” असं त्यांचीच मुलं मोठी झाली की म्हणतात.अंत्या मला तसंच संबोधतो.कुणी म्हणेल हा अंत्याचा फटकळपणा आहे.मी तसं नाही मानत.अंत्या आपल्या आईला “आमची म्हातारी” च म्हणतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल.हे कोकणी संस्कार आहेत बरं का!.

मंडळी,तुम्ही म्हणाल की मला आज अंत्याचा एव्हडा पुळका का आला? कुणी म्हणेल मी आज ” घुटूं ” घेऊन लिहायचं ठरवलंय का?कुणी कशाला हो? मनात आलं तर अंत्या स्वतःही असं म्हणायला सोडणार नाही.पण खरं सांगू,
तसं काही नाही मंडळी.आम्ही फक्त “घुटूं” ह्या शब्दाची मस्करी करण्यात एनजॉय करतो. “घुटूं” ची चव आम्ही कधीच घेतली नाही.एनजॉय करायची गोष्ट अलायदाच म्हणावी लागेल.”घुटूं” घेणं म्हणजे काय पाप नाही म्हणा.

आज हा आमचा साईटवरचा तिनशेवा लेखनाचा प्रकार आहे. हा लेख आम्ही अंत्याला अर्पण करायचं ठरवलं आहे.साईटच्या लेखनपट्टीवर आज आमचं तीसरं शतक पूरं झालं.तुम्ही म्हणाल की ही स्वतःची आत्मप्रौढी चालली आहे.पण तशातला काही भाग नाही, मंडळी. आमच्या गतआठवणी कृतकृत्य झाल्याची समाधानी देत आहेत.

एका सदगृहस्थाच्या सुचनेवरून मी साईटचा सदस्य होऊन एव्हडा काळ गेला.त्यांची या ठिकाणी त्यांची आठवण न करून कसं चालेल? आणि त्यानंतर अंत्यानी आम्हाला सुवर्ण संधी देऊन आपली साईट अक्षरशः आम्हाला मोकळी केली जशी इतरांना ही मोकळी केली असेल.म्हणून आम्ही तिनशे लेखनांची निर्मिती करू शकलो.त्यांचे ही आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.आमचा एकही लेख त्यांनी ह्या साईटवर प्रसिद्ध करायला मज्जाव केला नाही.आमचा स्वतःचाच ब्लॉग कसा आम्ही साईटचा वापर केला. खरंच मजा आली.
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची.
आमचं लेखन स्वांतसुखाय असतं असं काहीनां वाटत असेल पण,-तसं ते आम्हाला स्वतःला वाटत नाही. आम्ही म्हटलं जरा हा लेख “हटके” लिहावा एव्हडंच.

आम्ही मनात येईल ते लिहित राहिलो.मराठी शुद्धलेखन आणि साहित्य समजण्यात जर अर्ध आयुष्य घालवलं तर मग लिहायला कधी सुरवात करायची.?
मात्र मराठीची प्रगती,शुद्ध/अशुद्ध लेखन वगैरे सारख्या मोठ्या विचारात आम्ही आम्हाला गुरफटून घ्यायला गेलो नाही. अहो,आपली भाषा ही आपल्या आईसारखीच आहे नव्हे काय?आपली आई नेहमी शुद्धच असते,तशीच भाषाही असते.असं आम्हाला वाटतं.जे सुचतं ते लिहावं,ज्यांना आवडेल ते वाचणार,प्रतीसाद द्यावासा वाटला तर ते देणार.प्रतीसादाच्या संख्येवरून लेखनाची प्रतिभा ओळखली जाते असं आम्ही समजत नाही.लेख पारदर्शक असतील तर वाचून मजा येते असं आम्हाला वाटतं.प्रतिक्रियेची गरज नसावी.रोज रोज,
“लेख फार छान लिहिला आहे” अशी काय ती प्रतिक्रिया द्यायची?”.
असं आमचे वाचक लिहितात.आणि ते खरंही आहे.

पण एक खरं आहे.अंत्यानी शुद्धलेखनावर कसलाच अटकाव आणला नाही म्हणून आमच्यासारख्याचं फावलं. अहो दीर्घ चा दि र्‍हस्वं काय किंवा दीर्घ काय? काय फरक पडतो? सांगा.निदान लिहीताना आम्हाला काही फरक वाटत नाही.ज्याना वाटत असेल त्यांना आम्ही काही करू शकत नाही.कवट काय आणि कवठ काय संदर्भाशी संबंध येतो ना?बामण काय आणि ब्राम्हण काय?ज्याला जसं वाटतं तसं तो उच्चार करतो. साईटवर अनेक विद्वान लेखक आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे.

अहो,बहिणाबाई,तुकाराम कुठल्या विद्यापीठात गेले होते.?म्हणजे त्यांची नावं घेऊन आमची आम्ही बरोबरी करतो असा उगाच गैरसमज करून घेऊ नका.आम्ही त्यांच्या पुढे यकःश्चीत आहोत.पण मंडळी,सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की लेखन हा एक निर्मितीचा प्रकार आहे.ते विचार कुणालाही सुचूं शकतात.निसर्गाकडे नेम आहेत नियम नाहित.म्हणूनच निसर्ग फोफावत असतो.माझ्याच दोन ओळी आठवल्या,निसर्गाचंच बघा ना,

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊन सर्वां उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मनातल्या तुझ्या आठवांची

अनंतराव अंतरकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी इथेच आवरतं घेतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com