Friday, October 21, 2011

खळगे खणण्यातली मजा.



“माझ्या अहंमन्यतेला झुगारून द्यायला मला थोडा वेळ द्यावा लागला.”

श्रीधरची कोकणात खूप इस्टेट आहे.अलीकडे त्याने आपलं वाडवडीलांचं जूनं घर,जूनं घर कसलं? वाडाच होता, मोडून नवीन टुमदार बंगली बाधली होती.आणि तीसुद्धा शेताजवळच.हल्ली त्यालाच फार्म-हाऊस म्हणतात असा माझा समज होता.

मागे मी श्रीधरला भेटलो होतो त्यावेळी मी त्याला म्हणालो होतो,
“मी तुझं फार्म-हाऊस बघायला यायचं म्हणतोय.”
मला कोकणातला पावसाळा भारी आवडतो हे श्रीधरला माहित होतं.मी मागे बोलल्याची मला आठवण करून देत श्रीधरने ह्या पावसाळ्यात नक्की येण्याचं आमंत्रण दिलं.

एक आठवड्यासाठी मी श्रीधरच्या फार्म-हाऊसवर पावसाळ्याच्या दिवसात कोकणात गेलो होतो.पाऊस दाबून पडत होता.सर्व भोवताल हिरवं गार झालं होतं.कोकणात अजूनही थंडी पडते.आणि पावसात सर्व थंड झाल्यावर कोकणात खूपच मजा येते.धो,धो पाऊस पडत असल्याने घराच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.त्यामुळे घरी बसून गप्पा मारण्यापलीकडे काहीच उरलं नव्हतं.

श्रीधर शेतकी इंजीनीयरींग कॉलेज मधून ग्रॅड्युएट झाला असल्याने त्याला आपल्या फार्म-हाऊसवर खूप सुधारणा करयाला वाव मिळाला होता.आपल्या वडीलांच्या वेळच्या गप्पा गोष्टी सांगत असताना त्याला त्याच्या लहानपणी,शेतात काम करीत असताना वडलांकडून मिळत गेलेली शिस्तीची वागणूक आठवून गमती सांगत होता.

मला म्हणला,
“जमीनीत खळगा करायला मला विशेष आवडतं.मला आठवतं माझ्या लहानपणी माझे बाबा जे मला करायला सांगायचे ते करायला मी क्वचितच नाकारायचो.पण कधी नाकारायचा प्रसंग आलाच,बहुदा असा प्रसंग आम्ही आमच्या शेतात काम करताना यायचा, तर माझे बाबा मला सांगायचे,
“हे मी सांगीतलेलं काम तुला करायचं नसेल तर,कुदळ आण आणि मी सांगेन तिथे खळगा खण.”
त्यांच्या सांगण्यात गंमत कसलीच नसायची.ते गंभीर होऊनच मला सांगायचे.त्यामुळे मी लगेचच ते काम घ्यायचो.

माझ्या लहानपणी,खळगा खणणं,ही मला मोठी शिक्षा वाटायची.दुपारच्या समयात,जमीनीत सापडण्यासारखं काहीही नसताना,खळगा खणणं म्हणजे एखाद्या गुलामासारखं,खण,खण खळगा खणून मी माझ्या हातापायाला चिकट माती लावून घ्यायचो.अर्थात,दहा वर्षाच्या वयाचं माझं ते मन जरा जास्तच वाईट वाटून घ्यायचं.पण त्यातलं खरं तथ्य म्हणजे,खळगा खणणं हे एक निर्थक,पण गंमत देणारं काम आहे असंही मला वाटायचं.

त्यानंतर जीवनात मी बरेच खळगे खणले आहेत.शेतात म्हणाल तर रोजच खळगे खणावे लागायचे.त्रास म्हणून नव्हे,शिक्षा म्हणून नव्हे तर तो एक रोजच्या कामातला भाग होता.माझं पूर्ण जीवन,ज्यांचं जीवनात खळगे खणायचंच काम होतं,अशा लोकांच्या बरोबरीने काम करण्यात गेलं.योग्य शब्दात सांगायचं झाल्यास,ते शारीरीक परिश्रम असायचे.पण शेवटी मतितार्थ एकच त्यांची रोजगारी म्हणजे त्यांचे हात असायचे.

नंतर माझ्या बाबांनी मला शाळेत शिकायला घातलं.मी कॉलेजातही चांगले गुण मिळवित होतो.
त्यानंतर बरेच दिवस मी अशी समजूत करून घेतली होती की,हाताने रोजगारी करणारे,पण मनाने काम न करणारे हे काही कारणास्तव कमी दर्जाच्याचे आहेत.सहाजीकच त्या हाताने काम करणार्‍यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे असं मला वाटायचं.पण नशिबाने मी माझी ही समजूत चुकीची आहे हे शेतकी कॉलेजात शिकायला गेल्यावर लक्षात आणू शकलो.

आमची शेतीवाडी भरपूर असल्याने,शेती व्यवसायात येत असलेल्या आधूनिक बाबी शिकायला मला माझ्या बाबांनी पुण्याच्या शेतकी कॉलेजात घातलं.त्या शिक्षणक्रमात मला हाताने काम करणं अगदी आवश्यक होतं. महत्वाचं म्हणजे,ज्यांनी आपल्या जीवनाची घडण हात वापरून केली अशा लोकांशी माझी भेटाभेट व्ह्यायला लागली.

घरच्या समृद्ध परिस्थितीमुळे मला बर्‍याचश्या गोष्टी सहज मिळत गेल्या असल्यातरी,कॉलेजातल्या वर्कशॉपमधे माझ्या हातांचं कसब अपूरं पडायला लागलं.साधं उदाहरण म्हणून सांगतो.आमचे मास्तर वेल्डींग कसं करायचं ते आम्हाला शिकवत होते.ज्यावेळी प्रथमच मी वेल्डींग करायला गेलो तेव्हा ती वेल्डींग करायची सोल्डरची कांडी, ज्या टेबलावर वेल्डींगचा जॉब ठेवला होता,त्या टेबलाला कशी चिकटून राहू नये हे शिकण्यात माझा अर्धा वेळ जायचा.

माझ्या स्वाभिमानाला तेव्हा तडा गेली जेव्हा वेल्ड केलेले आमचे जॉब मास्तरांकडे गुणदोष तपासून गुण मिळण्यासाठी गेले तेव्हा.
वेल्ड केलेले धातूचे दोन तुकडे मास्तर निरखून पहात असताना,माझा वेल्डींगचा भाग हा काहीसा नुसता थापलेला सोल्डर दिसत होता.दोन धातूचे तुकडे जेमतेम एकमेकाशी धरून होते.परंतु,माझ्या इतर वर्ग मित्रांचं काम फारच उच्च दर्ज्याचं होतं.सोल्डर नीट वितळून दोन धातूंच्या तुकड्याशी संलग्न झाल्यासारखं दिसत होतं.

आणि ह्याचवेळी माझ्या लक्षात आलं की,दोन प्रकारचं बुद्धिचातूर्य,दोन प्रकारची प्रतिभा असते.काही लोक आपल्या बुद्धिमुळे चतूर असतात तर काही आपल्या हातामुळे असतात.काही माझ्याशी सहमत होणार नाहीत पण एका पेक्षा दुसरं वरचढ नसतं.कारण दोघांना एकमेकाची जरूरी भासत असते.

काही चतूर लोकांकडून घर बांधणीची योजना करून घेता येईल पण ते घर बांधायला चतूर हातांच्या लोकांशिवाय ते शक्य होणार नाही.माझ्या अहंमन्यतेला झुगारून द्यायला मला थोडा वेळ द्यावा लागला.मला समजून आलं की एका एव्हडंच दुसरं चातूर्य महत्वाचं आहे,नव्हेतर दोन्ही सारखीच महत्वाची आहेत.
खळगे खणण्यात काय महत्व असतं आणि काय मजा असते ते तेव्हा मला कळलं.”

मी श्रीधरला म्हणालो,
“तुझा बंगला आणि त्याच्या भोवतालचा परिसर पाहून, चतूर हात आणि चतूर डोकं कसं वापरलं जातं हे, कळायला मला वेळ लागला नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com