Saturday, October 15, 2011

गाण्यातून बोलगाणं



“मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं.”

काही वर्षापूर्वी मी एका साईटवर माझे लेख, कविता, अनुवाद लिहायचो.त्याची आज आठवण आली.ह्या साईटवर लिहिण्यासाठी मला एका सदगृहस्थाने सुचीत केलं होतं.ह्या साईटची खासियत म्हणजे,त्या साईटवरच्या लेखांच्या संख्येपेक्षा प्रतिसादांची (?) संख्या जास्त असायची.बर्‍याच लोकांच्या खर्‍याखुर्‍या प्रतिक्रिया असायच्या.पण गंमत म्हणजे त्यात, कुणाच्याही लेखनावार नेहमीच प्रतिक्रिया देणारा, एक कंपू होता.
“आला लेख की हाण.
आली कविता की हाण
झाला अनुवाद की हाण”
हा त्या कंपूचा मनसुबा असायचा.आणि मग प्रतिक्रियेची झोड व्हायची. आपसात एकमेकावरच्या प्रतिक्रियेवर आणि त्यानी दिलेल्या प्रतिक्रियेवर हाणा हाणी व्हायची.लेखन करणारा लेखक पण त्यांच्या प्रतिक्रियेवर आपल्या प्रतिक्रिया द्यायचा.असं चालायचं.

एकदा मी एका हिंदी गाण्याचा अनुवाद करून अशी कविता लिहिली,

आज दिसेना द्रव ही नयनी

अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
होऊनी रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

अंधारलेली ही रात्र कुणा
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

झालं.ही कविता वाचून बरेच प्रतिसाद आले..त्यात त्या कंपूमधल्यांचेही प्रतिसाद आले.काहीनी अनुवाद करण्याच्या प्रक्रियेवरच टिका केली.त्या साईटवर, एकही लेख अथवा कविता न लिहिलेल्या आणि फक्त प्रतिक्रिया देण्याचा प्रपंच करणार्‍या,एका वाचकाने अनुवाद कसा करावा आणि करू नये कविता कशी लिहावी आणि लिहू नये ह्यावर भरपूर माहिती(?) दिली. ऐकून गंमत वाटली.

मग काय करावं?
मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं आणि त्यात काहीसा फरक करून आपली प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं.अर्थात,
श्री.पाडगांवकरांची क्षमा मागून.

जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं
तसं
आपण विचार करूं लागलो की,
आपल्याला अनुवाद सुचूं लागतो.
अनुवाद आपण साईटवर लिहूं शकतो
अनुवाद आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो.
साईटवर लिहिलं म्हणून कुणी मोठं नसतं
ब्लॉगवर लिहिलं म्हणून कुणी छोटं नसतं

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे.

अनुवाद असा असला पाहिजे,
म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
अनुवाद तसा असला पाहिजे,
म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
कुठलीही कविता आपल्याला वाचता ये्ते
त्याचा अनुवाद आपल्याला केव्हाही करता येतो
एकटं एकटं चालताना विचार करता येतो
कागद पेन्सिल घेऊन विचार करता येतो.
जेव्हा आपला मुड लागतो
अनुवाद आपणच सुचूं लागतो

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे

तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही अनुवाद कळतो
माझा अनुवाद मग तुम्ही वाचूं लागता
आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता.

कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा
कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा
अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं
अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं

फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही
द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही
अनुवाद चमचम चांदीचा
हिरव्या हिरव्या फांदीचा
तो झुळझूळ वार्‍याचा
ट्विंकल ट्विंकल तार्‍याचा

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे

गाण्यातून बोलगाणं सुचलं हे काय कमी झालं?
प्रति्क्रिया देणार्‍यांचं होवो भलं
अन
प्रतिक्रिया न देणार्‍यांचं पण होवो भलं
असं मी माझ्या मनात म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com