Wednesday, October 12, 2011

माझ्या बाबांचे ते शब्द.

“मला माहित होतं की,मी लिहिलेलं जरी लोकांना आवडलं नाही तरी काहीही फरक पडत नाही.मी लिहितच रहाणार.”

सुधा लहानपणापासून लठ्ठ असलेली मी पाहिली आहे.जे ती खाईल त्याची बरेच प्रमाणात जरबी व्हायची. सुधाच्या बाबांनी ही व्याधी डॉक्टरना दाखवली होती.
“अतिशय कमी प्रमाणात हा रोग लोकांना असतो.त्यांच्या शरीराचा चयापचय बिघडल्यामुळे असं होत असतं.”
सुधाचे डॉक्टर तिला म्हणाले.
सुधा तिच्या डॉक्टरांकडून उपाय करीत असायचीच पण त्याला यश यायला खूप अवधी लागणार हे तिला डॉक्टरानी सांगीतलं होतं.

तिच्या बाबांना हा तिचा लठ्ठपणा पाहून चलबिचल व्ह्यायला व्हायचं.तिचा दोष नसताना ते तिच्यावर रागवायचे.शाब्दीक मारा करायचे.त्याचं सुधाला खूपच वाईट वाटायचं.मला ती भेटली असताना बरेच वेळा आपल्या बाबांच्या ह्या वागण्याची तक्रार करून सांगायची.मला तिची कीव यायची.

आता सुधा मोठी झाली आहे.दिसायला आहे तशीच आहे.पण एक चांगली लेखिका आहे हे मला माहित होतं.तिच्या कवितेचा संग्रह छापून प्रसिद्ध होणार आहे हे मला तिच्याकडूनच कळलं.त्या सोहळ्या दिवशी मी तिच्याकडे गेलो होतो.सर्व कार्यक्रम निवांत होऊन गेल्यावर मी सुधाशी गप्पा मारीत बसलो होतो.

“तुला लेखन करायचं कविता लिहायची हे कसं सुचलं?”
मी सुधाला विचारलं.

मला म्हणाली,
“माझे बाबा मला म्हणायचे,
“तू आळशी आहेस,लठ्ठ आहेस आणि मुर्ख आहेस.”
माझ्या बाबांच्या ह्या शब्दांशी मी संघर्ष करायचं ठरवलं.मी आठ वर्षांची असताना माझ्याच खोलीत बसून, माझ्या जाडजूड बोटांमधे पेन धरून एका वहित मनात येईल ती कविता आणि मनात येईल ती लहानशी गोष्ट गीरबटून काढायची.
कागदावरचे हे गीरबटलेले शब्द,माझ्याबरोबर माझ्या बिछान्यात लोळायचे.ते शब्द माझी ढाल,माझं संरक्षण होऊन मला रात्र निभावून न्यायला मदत करायचे.

पण रोज दुसर्‍यादिवशी सकाळी माझ्या बाबांचे ते शब्द मला गदगदून बिछान्यातून उठवायचे. आळशी,लठ्ठ,मुर्ख हे शब्द माझं डोकं भणावून सोडायचे आणि माझे डोळे उघडल्यावर मला ते खरंच वाटायचं.मी खडबडून जागी होऊन बिछान्यातून उठायचे आणि तशीच त्या कागदावर आदल्या रात्री लिहिलं सर्व खोडून टाकून द्यायचे.

ह्या शाब्दीक माराचा नेहमीचा नेम, मी किशोर वयातून प्रोढवयात येईपर्यंत, चालायचा.माझ्या मनाला, माझ्या आत्म्याला आणि माझ्या दूरदृष्टीला त्या शब्दांनी एक आकार दिला होता.मी ज्यावेळी आरशात पहायची त्यावेळी खरोखरच मी आळशी,लठ्ठ आणि मुर्ख मुलगी आहे असं माझे बाबा म्हणायचे ते आरशात भासायचं.

आणि असं असूनसुद्धा प्रत्येक रात्री मी काहीतरी लिहायचे.जणू माझं जीवनच त्यावर अवलंबून आहे असं समजून लिहायचे.वेळोवेळी मी माझे ते लिहिलेले शब्द वाचून काढायचे.मला ते मी लिहिलेले शब्द बरे वाटायचे.पण ज्या क्षणी मी लिहिलेले ते शब्द माझ्या डोक्यात शिरायचे त्या क्षणी माझ्या बाबांचे शब्द त्यांचा पाठालाग करून त्यांना माझ्या मेंदुतून हुसकावून काढायचे.

आणि असं असूनसुद्धा प्रत्येक रात्री मी लिहिलेले शब्द वाचून मला आराम वाटायचा.जणू माझ्या भावनाना, पेनातून आलेले कागदावर खरडलेले शब्द, एकदम साफ फुसून टाकयची क्रिया करायचे.माझा आत्मसंदेह, जणू एखाद्या ब्लॅन्केट सारखा मला भासायचा.मी त्यात गुंडाळून घ्यायची,विशेष करून मला नवी मैत्रीण भेटली असताना,एखादी नवी संधी माझ्याजवळ आली असताना.

तरीपण मी माझं लेखन पुसून टाकायची.कारण त्यामुळे,मी मलाच सांगायची,मला कुणीही मी कशी वाईट आहे ते सांगायचा धीर करणार नाही.
फक्त माझे बाबाच मला असं म्हणू शकतात,ज्याना कसलातरी शारीरीक व्याधी झाला होता हे मला मी एकतीस वर्षाची झाल्यावर कळल्यानंतर, ह्याची शक्यता कमी झाली.मला मी जिथे रहायची तिथे एकदा फोन आला की माझे बाबा ह्या जगात आता नाहीत.

त्यांचे ते शब्द त्यांच्या मागे राहिले.परंतु,त्यानंतर मला कळलं की ते शब्द मला आता लागू पडणार नाहीत. जसं मी पूर्वी रात्रीचं करत आले तसंच मी केलं.मी बसून लिहायला लागले.वह्यांच्या वह्या भरभरून मी,माझ्या बाबांबद्दल,माझ्या जीवनाबद्दल आणि माझ्या श्रद्धेबद्दल लिहित राहिले.

पण ह्यावेळेला मी सकाळी उठून ते शब्द परत वाचू लागले.ते मी पुसून टाकले नाहीत.माझ्या लक्षात आलं की,असं करणं,त्यांना पूसून टाकणं, अनाड्यासारखं आणि निंदनीय होईल.

जशी वर्षं निघून गेली तशी माझं मला दिसायला लागलं की,मी किती सफल लेखक आहे ते.मी ठरवलं की माझे लेख आणि कविता मी छापायला द्यायच्या.जेणेकरून मला दाखवून द्यायचं होतं की मी माझ्या बाबांच्या शब्दांच्या व्यतिरिक्त,कशी आहे ते. आणि त्यासाठी मी माझ्या वयक्तिक भावना कागदावर लिहून,ज्या कुणाला वाचायची कदर असेल तो ते वाचो, असं ठरवून टाकलं.
मला माहित होतं की,मी लिहिलेलं जरी लोकांना आवडलं नाही तरी काहीही फरक पडत नाही.मी लिहितच रहाणार.

मला आता असं वाटतं की,माझ्या बाबांचे ते शब्द मागे राहिले.ते शब्द लुप्त झाले.आणि मी जी आळशी, लठ्ठ आणि मूर्ख मुलगी होते तिला डोकं आहे,आत्मा आहे आणि सुंदरता आहे ती पण तिची स्वतःची अशी माझी खात्री झाली.”

“तुझा लठ्ठपणा आणि तुझ्या बाबांचे ते शब्द,तुला एक सफल लेखिका बनायला कारणीभूत झालं हे पाहून,
“जे काही होत असतं ते बर्‍यासाठीच होत असतं.”
असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं.तुला कसं वाटतं?”
सर्व ऐकून झाल्यावर मी शेवटी सुधाला म्हणालो.

“मी तुमच्याशी ह्यापेक्षा जास्त सहमत होऊच शकणार नाही”
सुधाने चेहरा आनंदी करून मला उत्तर दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com