Monday, October 24, 2011

दोन वाळूचे कणही सारखे नसतात.

“आज मला वाटतं, एखादा, अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा, अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.”

फॉल चालू झाल्यावर इतक्या लवकर इतकी जोरात थंडी पडत नाही हा माझा अनुभव होता.अजून पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला जायला काहीच हरक नसावी असं मला वाटत होतं.आज सकाळीच खिडकीच्याबाहेर डोकावून पाहिल्यावर काहीच दिसत नव्हतं.एव्हडं की शेजारच्या परसातलं सफरचंदाचं झाड अजिबात दिसत नव्हतं.धुकंच एव्हडं पडलं होतं त्यामुळेच हे झालं होतं.

तेव्हड्यात प्रो.देसायांचा फोन आला.
“आज संध्याकाळी तुम्ही आमच्याच घरी या.खूपच थंडी आहे त्यामुळे संध्याकाळी तळ्यावर जाण्याचं टाळलेलं बरं.”

मी संध्याकाळी भाऊसाहेबांच्या घरी गेलो.प्रो.देसायांबरोबर आणखी दोन गृहस्थ गप्पा मारीत असताना दिसले. त्यापैकी एका गृहस्थाची आणि माझी ओळख होती.दुसर्‍यांशी माझ्याशी ओळख करून दिली गेली.

भाऊसाहेब मी येताच म्हणाले,
“तुमचीच आम्ही वाट पहात बसलो होतो.तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या.”

मी म्हणालो,
“आज गप्पाचा खास काय विषय आहे.?”

“त्याचीच प्रस्तावना करण्यासाठी मी तुमची वाट पहात होतो.ऐकातर.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले,
“माझ्या लहानपणी असं सांगीतलेलं मी ऐकलंय की,आकाशातून पडणारे दोन बर्फाचे पापुद्रे सारखेच नसतात. त्यासाठी समुद्रावर जाऊन मुठभर वाळूतल्या कणात साम्य आहे काय, हे पहाण्याचा प्रयत्न मी केला.ते मुठभर वाळूचे कण वेगवेगळे होते.काही काळे आणि तूटलेले तर काही गोल आणि पूर्ण होते.काही चपटे आणि उन्हाने भुरे झाले होते.पण कितीही प्रयत्न करून एकसारखे दोन कण मला मुळीच पहाता आले नाहीत.मला वाटतं, सामान्यतेतच खरी जादू आहे.त्यात विशिष्टता असते,अद्वितयता असते.

प्रत्येक वस्तू विशिष्ट असते,अद्वितीय असते त्याचबरोबर पूर्णपणे सारखी असते.हे पहाण्यासाठी जगाकडे दोन-चार निराळ्या दृष्टीकोनातून बघण्याची जरूरी आहे.उदा.म्हणून सांगायचं झाल्यास,जगातला कोणताही पदार्थ घेतल्यास तो तीन साध्या गोष्टीने बनलेला असतो-प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेकट्रॉन्स.ह्या तीन गोष्टी एकत्र येऊन एकमेकात त्या वेष्टित होतात,त्यांची चवड होते आणि मग सर्व काही होतं.अगदी शब्दशः प्रत्येक गोष्ट,अन्य गोष्टीने बनते.

हे लक्षात ठेवूनच,बरेच वेळा ह्या क्लिष्ट गोष्टीत असलेली गुढता आणि स्पष्टता समजून घ्यायला मला आधार मिळतो.सरतेशेवटी, तेच नियम आणि तिच नियंत्रण ठेवणारी ताकद, इतर गोष्टी बनवायला अणुचा वापर करते. सहाजीकच मीही स्वतः ह्या अणूंचाच बनलेलो आहे.”

हे प्रो.देसायांचं तत्वज्ञान ऐकून मी म्हणालो,
“ह्यामुळेच मला वाटतं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे,प्रत्येक वादाला पर्याय आहे,प्रत्येक “कां?” ला स्पष्टीकरण आहे.हे खरं आहे की असे अनेक प्रश्न आहेत की त्यांना माझ्याजवळ उत्तर नाही,पण त्याचा अर्थ ते प्रश्न अस्तित्वातच नाहीत असं नाही.एव्हडंच की त्यांची उत्तर अजून शोधून काढायची आहेत.
उलटपक्षी,मला असंही वाटतं की,प्रत्येक गोष्ट स्वतः पुरती असते.आपल्याला काय वाटतं?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून भाऊसाहेब म्हणाले,
“विशिष्टता आणि अद्वितयता हा दुहेरी सिद्धान्त मनात बाळगून राहिल्याने माझ्या जीवनाने मला नम्र आणि कृतकृत्य बनवलं.कसं ते सांगतो.
एखाद्या झाडाखाली मिळेल ते एखादं पान उचलून पाहिल्यावर त्यात जगातलं आतलं जग,जगावरचं जग माझ्या हातात आहे असं मला वाटतं.ज्या झाडावरून ते पान पडलं त्या झाडाकडे पाहिल्यावर,माझ्यातला आणि त्या झाडातला फरक म्हणजे,अणुची संख्या,त्यांचं क्रमस्थान आणि घनत्व ह्याने झालेली आमच्या दोघांची, म्हणजेच त्या झाडाची आणि माझी, घडण अगदी सरळपणे स्पष्ट होते.

झाड हे झाडासारखंच असणार.पण मी, उठून भोवताली जाऊ शकतो.मला बोलता येतं,पोहता येतं,प्रेम आणि द्वेष करता येतो आणि कसल्याही गोष्टीत भाग घेता येतो ह्यामुळेच मी माणूस आहे हे समजलं जातं. माझ्या भोवतालचं जग माझ्यात बदल घडविण्याऐवजी जगालाच मी हवं तसं बदलू शकतो हे माझ्यातलं सामर्थ्य काय कमी आहे? ह्याचा विचार येऊन मग वाटतं, अणूच्या संम्मिलनाने झालेली माझी ही घडण आहे. मला मिळालेल्या ह्या पर्यायाने माझं मलाच धन्य वाटायला लागतं.

गेली अनेक वर्षं मला लोक विचारतात माझ्या श्रद्धेबाबत.पण आज मला त्याचं उत्तर गवसलं आहे.आज मला वाटतं,एखादा अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.ह्या सुंदर,गहन आणि अखंड जगाबाबत मला विशेष वाटतं.
सर्व गोष्टींचं अस्तित्व आणि सर्व गोष्टीत असलेले आपलं अस्तित्व ह्याबद्दल मला विशेष वाटतं.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“खरंच भाऊसाहेब,आजची संध्याकाळ मजेत गेली.काही तरी मी नवीन शिकलो असं मला वाटतं.त्या दोघा गृहस्थानी मला दुजोरा दिला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com